सोमेश्वरनगर। रमेश कदम.
निंबुत (फरांदे वस्ती) येथील युवा, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विकास महादेव फरांदे (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने निंबुत गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे विकास फरांदे यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळ्याची नाती जोडली होती.
शेती व्यवसाय सांभाळत असताना ते नीरा येथील ज्युबिलंट कंपनीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोकरी करत होते. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा एक उमदा तरुण हरपल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, एक भाऊ, एक बहीण, दोन चुलते, असा मोठा परिवार आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेले विवेक फरांदे हे त्यांचे धाकटे बंधू असून, प्रकाश फरांदे यांचे ते पुतणे होत.
विकास फरांदे यांच्या अकाली निधनाने निंबुत गावाने एक कष्टाळू, सर्वांना आपलेसे करणारा तरुण गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


0 Comments