दुष्काळी काळातील लोकाभिमुख कामगिरीमुळे मिळवला जनमानसात मानाचा ठसा; निंबूत येथे उद्या अंत्यसंस्कार
बार्शी / बारामती, दि. १२ जून :
बार्शी मतदारसंघाचे माजी आमदार, सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ नेते कृष्णराव नानासाहेब देशमुख (आबा) यांचे आज (दि. १२ जून) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कृष्णराव आबा देशमुख यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले. १९७२ ते १९७७ या कालावधीत त्यांनी बार्शी पंचायत समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. विशेषतः १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी केलेल्या मदतकार्यामुळे त्यांची ओळख जनतेच्या खऱ्या आधारवडाप्रमाणे निर्माण झाली. संकटग्रस्त शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आजही आठवण काढली जाते.
यानंतर १९७८ ते १९८० या काळात त्यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी दिग्गज प्रतिस्पर्धी पन्नालाल सुराना यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार म्हणून त्यांनी बार्शीच्या विकासासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करत मतदारसंघाचा आवाज राज्याच्या विधिमंडळात बुलंद केला.
राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. तसेच वैराग येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून कारखान्याच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
आबा देशमुख यांचे कौटुंबिक नातेही सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी जोडलेले होते. ते सहकार महर्षी स्वर्गीय मुगुटराव (आप्पा)काकडे दे. यांचे व्याही होते, तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी (काका) काकडे दे.यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. जनसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देणारे आणि लोकहितासाठी सातत्याने झटणारे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कृष्णराव (आबा) देशमुख यांच्यावर उद्या (दि. १३ जून) सकाळी ९ वाजता बारामती तालुक्यातील निंबूत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

0 Comments