Someshwarnagar । मोक्का गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार आरोपी वाघळवाडीतून जेरबंद; आसरा देणाऱ्यालाही अटक.


पुरंदर रिपोर्टर. Live. 

सोमेश्वरनगर। रमेश कदम.  

              गुन्हे शाखा युनिट-०५, पुणे शहरच्या पथकाने मोक्का (MCOCA) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथून अटक केली. तसेच आरोपीला आश्रय देणाऱ्या एका सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांनाही पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



           वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे शहरातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध सुरू असताना, वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी रोहित भारत गायकवाड (वय २५, रा. गोसावी वस्ती, हडपसर) हा बारामती तालुक्यातील वाघळवाडी परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.



            या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-०५च्या पथकाने कन्नडवस्ती, वाघळवाडी येथे छापा टाकून रोहित गायकवाड याला ताब्यात घेतले. तपासात तो ऋतिक ऊर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६, रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी) याच्या घरी वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. रावळकर हा स्वतःही वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी असून, रोहित गायकवाड हा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती असतानाही त्याने त्याला आश्रय दिल्याचे तपासात स्पष्ट झाले.

            दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

           ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-०५चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार व पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे, स्वाती तुपे, जयदेव भोसले, नेत्रिका अडसुळ, नासेर देशमुख आणि महिला पोलीस अंमलदार मयुरी पालवे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments