सोमेश्वरनगर, रमेश कदम
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुरूम येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल (भागशाळा मुरूम) येथे चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्था सदस्य सुनिल आबा भोसले, मुरूमचे सरपंच संजयकुमार शिंगटे, माजी सरपंच प्रदीप कणसे, रविदास जगताप, हरिश्चंद्र जगताप, ग्रामपंचायत सदस्य प्रशिल जगताप, नुसरतभाभी इनामदार, शेखर कोंडे, रहिमतुल्ला इनामदार, दीदार इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभाव, स्वच्छतेबाबतची भूमिका, वृक्षप्रेम, वक्तशीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. जे. जाधव व पर्यवेक्षक एच. टी. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल सोरटे, शितल सस्ते, स्वाती टेंगले, मोहिनी शितोळे, स्नेहल जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज कोरडे यांनी केले, तर आभार विनोद भोईटे यांनी मानले.


0 Comments