जेजुरी | प्रतिनिधी
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनारायण लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. २० जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालक रामा नारायण मोगविरा याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने आणि जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पाटील यांना संबंधित लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक व पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून कारवाई करण्यात आली. छाप्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले तसेच सहा महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांच्या पथकाने केली.
*वारंवार कारवाईनंतरही पुन्हा तोच प्रकार ः
लक्ष्मीनारायण लॉजचा चालक रामा नारायण मोगविरा याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा कथित देहव्यापार सुरू होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यामुळे संबंधित लॉजचा परवाना रद्द करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत तो कायमस्वरूपी सील करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. २०२१ मध्ये यवत येथील निसर्ग लॉजवर अशाच प्रकारची कारवाई करून तो सील करण्यात आला होता. त्याच धर्तीवर लक्ष्मीनारायण लॉजवरही कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*नागरिकांची ठाम मागणी.
- लक्ष्मीनारायण लॉजचा परवाना तातडीने रद्द करावा.
- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लॉज कायमस्वरूपी सील करावा.
- अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी व कठोर कारवाई करावी.


0 Comments