फलटण । प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेत विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबप्रमुखाला वाचवण्यासाठी धावलेल्या तिघांचाही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५) यांना बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत तारेत आलेल्या प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीय मदतीसाठी धावले.
सतीश शिंदे यांना वाचविण्याच्या प्रयत्नात गंगुबाई शिंदे (वय ४०), सचिन शिंदे (वय २६) आणि आरती शिंदे (वय २४) हे तिघेही एकामागून एक त्यांच्या संपर्कात आले. मात्र, विद्युत प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने चौघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला आणि काही क्षणांतच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, घराबाहेरील विद्युत तारेमध्ये प्रवाह कसा आला, ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली तसेच यामध्ये संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे का, याचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे खामगाव परिसरावर शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments