सोमेश्वरनगर । रमेश कदम
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वडगाव–कोऱ्हाळे खुर्द रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगत चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या विद्युत पोलांमुळे निर्माण झालेल्या वादाची प्रशासनाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करत परिस्थितीची पाहणी केली.
कोऱ्हाळे खुर्दचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरज खोमणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले काही विद्युत पोल भविष्यातील रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणार असल्याचे त्यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सातत्याने चालढकल होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.
याप्रकरणी आंदोलनाचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने तातडीने दखल घेत उपकार्यकारी अभियंता सोमेश्वर अरविंद अंभोरे, वडगाव निंबाळकरचे नवनियुक्त कनिष्ठ अभियंता किशोर कहार तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाचे अधिकारी सुबोध निंबाळकर यांनी संयुक्तपणे घटनास्थळी पाहणी केली.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी विद्युत पोलांचे काम नियोजनशून्य पद्धतीने झाल्याचे प्राथमिक स्तरावर निदर्शनास आल्याची माहिती मिळाली. यामुळे कामाच्या दर्जा व नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित त्रुटी तातडीने दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.
ग्रामस्थांनी विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देत जनतेच्या कराच्या पैशातून होणारी कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले विद्युत पोल त्वरित स्थलांतरित करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या संयुक्त पाहणीनंतर प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करते, याकडे आता वडगाव निंबाळकर व कोऱ्हाळे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



0 Comments