Baramati । बारामतीत कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश?; आठ जणांवर गुन्हा, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई.


पुरंदर रिपोर्टर Live.  

बारामती । रमेश कदम  

           बारामती शहरातील अरिहंत मिनी मार्केट येथे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा संशयित साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अन्नसुरक्षा व मानके अधिनियमासह विविध कलमान्वये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कृत्रिम दूध निर्मिती व पुरवठा करणाऱ्या संभाव्य रॅकेटचा तपास सुरू केला आहे.


            या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी फिर्याद दिली असून, ही कारवाई १६ जुलै रोजी करण्यात आली. राज्यातील विविध भागांत कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर बारामतीतील अरिहंत मिनी मार्केटवर छापा टाकण्यात आला.




            तपासणीदरम्यान २५ किलोचे व्हे पावडरचे एक पोते, सिल्क मिल्क पावडरची दोन पोती आणि व्हे परमिट पावडरची दोन पोती असा संशयित साठा आढळून आला. संबंधित साहित्याच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे मागविण्यात आली असता, आस्थापनाचे मालक संदीप अशोकलाल बागमार यांना ती सादर करता आली नाहीत.


          प्राथमिक चौकशीत हे साहित्य विविध दूध विक्रेते, दूध संकलन केंद्रे आणि शीतकरण केंद्रांना पुरवठा करण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कृत्रिम दूध निर्मिती आणि वितरणाच्या संभाव्य साखळीचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.


           या प्रकरणी संदीप अशोकलाल बागमार, निलेश मोरे, भोरी मॅडम, दत्तात्रेय बोधे, दीपक पिसाळ, प्रवीण दातीर, सुरज सोलनकर आणि हेमंत टेके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामती शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments