मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही वेळातच 10वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

 


नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील एका आश्रमशाळेत इयत्ता 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूच्या कारणाबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी शाळेतील एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने त्याला कार्यालयात बोलावून समज दिली होती. तसेच या प्रकाराचा त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी पालकांशी चर्चा करण्याबाबत सांगण्यात आले होते.

यानंतर काही वेळाने विद्यार्थी वसतिगृहातील खोलीत गेला. काही वेळानंतर इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. शिक्षकांनी तातडीने त्याला उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणाची वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली आहे.

या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, देखरेख आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Post a Comment

0 Comments