मुंबई : चेंबूर परिसरात गर्भवती महिलेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने आपल्या गर्भवती प्रेयसीला शीतपेयातून विषारी पदार्थ दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सुमारे दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती होती. आरोपी आशिष मगर आणि पीडित महिलेमध्ये काही दिवसांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. या वादानंतर आरोपीने सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवत महिलेला शीतपेय पिण्यास दिल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान या शीतपेयामध्ये विषारी पदार्थ मिसळण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शीतपेय प्यायल्यानंतर महिलेला उलट्या होऊ लागल्या आणि तिची प्रकृती अचानक खालावली. काही वेळाने तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत्यूपूर्वी महिलेला आरोपीने दिलेले शीतपेय प्यायल्यानंतरच प्रकृती बिघडल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि तपासाला वेग आला.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सखोल चौकशीनंतर या प्रकरणातील संशय अधिक बळावला असून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय तपासणीत विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे चेंबूर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

0 Comments