जेजुरी प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जेजुरी एमआयडीसी परिसरातील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या कंपनीच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये बुरशी, कीटक, अळ्या तसेच इतर अशुद्ध पदार्थ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंपनीचा आयुर्वेदिक औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
कंपनीच्या सिंहनाद गुग्गुळ, पुनर्नवादी मंडूर, त्रिफळा गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, हिंगवष्टक चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण या सहा औषधांच्या नमुन्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. काही औषधांमध्ये बुरशीची वाढ, निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सूक्ष्मजीव, गोळ्यांवर काळे डाग, तर काही चूर्णांमध्ये कीटक, अळ्या व इतर बाह्य अशुद्ध पदार्थ आढळले.
FDAच्या तपासणीत कंपनीकडे औषध निर्मितीचे आवश्यक पुरावे नसणे, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड अपूर्ण असणे, कच्च्या मालाच्या गुणवत्तेच्या चाचण्या न करणे आणि प्रयोगशाळेतील आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. उत्पादन विभागातील अस्वच्छता, यंत्रसामग्रीची नोंद नसणे, तापमान व आर्द्रता नियंत्रणाचा अभाव तसेच औषध विक्रीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचेही तपासणीत आढळले.
FDAने कंपनीला उत्पादन तात्काळ बंद करण्याचे आदेश देत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीला लेखी खुलासा आणि वैयक्तिक सुनावणीची संधी देण्यात आली. मात्र, समाधानकारक स्पष्टीकरण किंवा नियमांचे पालन केल्याचे पुरावे सादर करण्यात कंपनी अपयशी ठरली.
त्यानंतर उपलब्ध कागदपत्रे व कंपनीचा खुलासा विचारात घेऊन अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांनी इंड्युकेअर फार्मा प्रा. लि.चा आयुर्वेदिक औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला.


0 Comments