Pune । सामाजिक कार्याची दखल; प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांचा विशेष सन्मान.

 


पुरंदर रिपोर्टर Live. 

पुणे । प्रतिनिधी.  

            सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांचा सामाजिक कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

         डेक्कन चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत अरुण भोईटे यांच्या हस्ते प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ तसेच साहित्यिक व मार्गदर्शक तानाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

         प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, दिव्यांग, गरजू नागरिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांना मदतीचा हात देत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा विशेष सन्मान करण्यात आला.

         यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रेम मोरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही त्यांनी असेच कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.

        या कार्यक्रमास श्री. भोसले, श्री. तावरे, श्री. वाडकर, श्री. जाधव यांच्यासह डेक्कन चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते.

       संपूर्ण सत्कार सोहळ्याचे नियोजन राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांनी केले. आपुलकीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.



Post a Comment

0 Comments