Baramati । जातनिहाय जनगणनेसह ओबीसींच्या हक्कांसाठी १ सप्टेंबरला ‘चलो मुंबई ; ओबीसींचा विराट मोर्चा.


पुरंदर रिपोर्टर Live

बारामती । प्रतिनिधी


        ओबीसी समाजाच्या हक्क, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवरून समाजामध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसी समाजाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील ओबीसी समाजाच्या एकजुटीचे विराट शक्तिप्रदर्शन मुंबईत पाहायला मिळणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेली चिंता, आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी समाजातून जोर धरत आहे. त्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही, आपल्या हक्कांसाठी एकत्र यावेच लागेल’ या निर्धाराने १ सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.




आंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी पुणे येथे ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, अॅड. मंगेश ससाने, मृणाल ढोले, बळीराम तात्या खटके, बापूराव सोनवलकर, हिंदकेसरी समाधान पाटील, किशोर हिंगणे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोठ्या संख्येने एकत्र येऊन ओबीसी समाजाची ताकद आणि एकजूट दाखवण्याचा निर्धार करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून ओबीसी बांधवांनी मुंबईत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी ही लढाई असून, १ सप्टेंबरचा मुंबईतील एल्गार हा ओबीसी एकजुटीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.


‘चलो मुंबई! १ सप्टेंबरला मुंबईत ओबीसींच्या एकीचे दर्शन घडवूया!’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments