Someshwarnagar । श्री आई अंबिका माता पायीवारी दिंडी सोहळ्याचे वाणेवाडीतून उत्साहात प्रस्थान; २५० ते ३०० भाविकांचा सहभाग; वाणेवाडी ते देवीभोयरे असा आठ दिवसांचा पायी प्रवास


 पुरंदर रिपोर्टर Live.

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी :

              श्री आई अंबिका माता पायीवारी दिंडी सोहळा २०२६ चे मंगळवारी (दि. २५) वाणेवाडी (सोमेश्वर) येथून भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रस्थान झाले. वाणेवाडी ते देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असा आठ दिवसांचा पायी प्रवास करणाऱ्या या दिंडीमध्ये सुमारे २५० ते ३०० वारकरी, महिला, युवक आणि भाविक सहभागी झाले आहेत.



आई अंबिका मातेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान झाले. विविध गावांमधून पायी प्रवास करत ही दिंडी दि. २५ ऑगस्ट ते दि. १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत देवीभोयरे येथे पोहोचणार आहे.




दिंडीचा मार्ग वाणेवाडी (सोमेश्वर) येथून मोढवे, मोरगाव, सुपा चौफुला, पारगाव, न्हावरा, शिरूर, राळेगण थेरपाळ आणि निघोज मार्गे देवीभोयरे असा आहे. दिंडीचा पहिला मुक्काम दि. २५ रोजी मोढवे येथील मरी माता मंदिर येथे होणार आहे. त्यानंतर दि. २६ रोजी सुपा येथील मेगाई माता मंदिर, दि. २७ रोजी पारगाव येथील रेणुका माता मंदिर, दि. २८ रोजी न्हावरा येथील शिवराज मंगल कार्यालय, दि. २९ रोजी शिरूर हायवेवरील श्री समर्थ लॉन्स, तर दि. ३० रोजी राळेगण थेरपाळ येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे.

दि. ३१ ऑगस्ट ते दि. १ सप्टेंबर या कालावधीत देवीभोयरे येथे दिंडीचा अंतिम मुक्काम व सांगता होणार आहे. सर्व मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांचा मुक्काम राहणार असल्याची माहिती आयोजक नवनाथ शिंदे यांनी दिली.

दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणाऱ्या या पायीवारी दिंडी सोहळ्याचे हे १९ वे वर्ष असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदविला आहे. श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या दिंडी सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments