Lonanad । सालपे घाटात भीषण अपघात;मालट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू.

 


पुरंदर रिपोर्टर Live.  

लोणंद, प्रतिनिधी.    

         सातारा–लोणंद मार्गावरील सालपे घाटाच्या शेवटच्या उतारावर शनिवारी (दि. २९) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, अपघातानंतर मालट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

तानाजी खंडू खराडे (वय ५१) व रेखा तानाजी खराडे (वय ४९, दोघे रा. तडवळे, संमत कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी खराडे हे पत्नी रेखा खराडे यांच्यासह हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरून प्रवास करीत होते. सालपे घाट उतरत असताना घाटाच्या शेवटच्या उतारावर मालट्रक क्रमांक एमएच-१२ एसएक्स-६३७७ वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले. यावेळी मालट्रकने खराडे दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, तानाजी खराडे व रेखा खराडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, अपघातानंतर मालट्रकचालकाने अपघाताची माहिती न देता तसेच जखमींना उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी प्रमोद शिवाजी खराडे (वय ३४, रा. तडवळे, संमत कोरेगाव) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मालट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेगडे करीत आहेत. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार मालट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments