सोमेश्वरनगर। रमेश कदम.
पुणे जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणे भरली असून, निरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मात्र बारामती तालुक्यातील करंजे येथील सोमेश्वर देवस्थान परिसराला वरदान ठरलेले तळे अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत असून कोरडेच पडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी तसेच भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी सोमेश्वर देवस्थान, शेंडकर व भांडवलकर या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सोमेश्वर देवस्थानच्या शेजारी हे छोटे तळे बांधण्यात आले. कालांतराने महसूल विभाग तसेच सोमेश्वर देवस्थानच्या भाविकांच्या माध्यमातून दोन-तीन वेळा तळ्यातील गाळ काढण्यात आला. पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून तळ्याला योग्य आकार देण्यात आला. त्यामुळे तळ्यात बाराही महिने पुरेल एवढा पाणीसाठा होऊ लागला.
या तळ्यातील पाण्यामुळे परिसरातील विहिरींना पाझर फुटून शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली आली. तसेच सोमेश्वर देवस्थानमधील स्नान बारव व तीर्थ बारव या दोन्ही बारवांमध्येही चांगला पाणीसाठा राहू लागला. मात्र यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेइतके न झाल्याने तळे कोरडे पडले असून, दोन्ही बारवांची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
सोमेश्वर देवस्थानच्या धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही या तळ्याला विशेष महत्त्व आहे. तळ्यात पाणीसाठा असताना परिसराचे निसर्गसौंदर्य खुलून दिसते. यात्रा काळात भाविक व पर्यटक तळ्याच्या परिसरात मोठ्या संख्येने येतात. कार्तिक महिन्यात देवस्थानमध्ये महिनाभर काकड जागर केला जातो. त्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे हजारो भाविक तळ्यात काकडा सोडतात. रात्रीच्या अंधारात काकड्यांच्या प्रकाशाने उजळलेले तळे भाविकांसाठी विहंगम आणि मनोहारी दृश्य ठरते.
याशिवाय परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील गणेश मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठीही याच तळ्याचा वापर केला जातो. त्यामुळे धार्मिक, सामाजिक, शेती आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या तळ्यात यंदा पाणीसाठा होणार का, याकडे ग्रामस्थ व भाविकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून निरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असताना सोमेश्वर देवस्थानच्या तळ्याला मात्र पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने, या तळ्यात पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.


0 Comments