Malegaon । योग्य वेळ साधली अन् साखरेला मिळाला विक्रमी भाव; माळेगाव कारखान्याची दमदार कामगिरी !


पुरंदर रिपोर्टर Live

माळेगाव प्रतिनिधी :

               माळेगाव सहकारी साखर कारखान्याने साखर विक्रीच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवित १३ ऑगस्ट २०२६ रोजी साखरेला प्रति क्विंटल ₹४,८८१ असा आजवरचा सर्वोच्च व विक्रमी दर मिळविला. परिसरातील प्रमुख साखर कारखान्यांच्या तुलनेत हा दर लक्षणीयरीत्या अधिक असून, सोमेश्वर कारखान्याच्या टेंडरपेक्षा ₹१०१ तर भवानीनगर कारखान्याच्या टेंडरपेक्षा ₹५६ प्रति क्विंटलने अधिक आहे.

            माळेगाव कारखान्याने घाईघाईने साखर विक्री न करता बाजारपेठेतील परिस्थितीचा सखोल अभ्यास, दरातील चढ-उतारांचे निरीक्षण आणि योग्य वेळ साधून विक्रीचा निर्णय घेतला. मध्यस्थांशिवाय पारदर्शक पद्धतीने राबविलेल्या या विक्री धोरणामुळे कारखान्याच्या आर्थिक हितासोबतच सभासद शेतकऱ्यांच्या हितालाही प्राधान्य मिळाले आहे.




            या विक्रमी दराचा सकारात्मक परिणाम ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या अंतिम ऊसदरावर होण्याची शक्यता असून कारखाना वर्तुळात समाधानाचे वातावरण आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, युवा संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाचे अभिनंदन होत आहे. उपमुख्यमंत्री तथा माळेगाव कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सुरू असलेली वाटचाल ही स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील अग्रगण्य कारखाना घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

            येत्या हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. साखर विक्रीसोबतच इथेनॉल, उपपदार्थ निर्मिती आणि ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध कार्यपद्धती कायम ठेवून ही उद्दिष्टे साध्य करण्याचा विश्वास कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments