सोमेश्वरनगर : रमेश कदम.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (दि. ७) सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभासद व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भाजपकडून संपूर्ण पॅनेल उभे करून कारखान्याच्या सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
सहकार महर्षी चंदरअण्णा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी शेतकरी सभासद, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा परिसरातील मोर्चा, आघाडी व मंडल अध्यक्षांशी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.
मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सोमेश्वर कारखान्याची निवडणूक भाजपने कोणतीही तडजोड न करता स्वबळावर लढवावी, अशी आग्रही मागणी केली. शेतकरी सभासदांच्या हितासाठी सक्षम आणि पारदर्शक पर्याय उभा करण्याची भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
कार्यकर्त्यांच्या भावना आणि चर्चेचा आढावा घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सर्वानुमते सोमेश्वर कारखान्याची निवडणूक संपूर्ण पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे यामुळे सोमेश्वर च्या या पंचवार्षिक निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
मेळाव्यास सहकार महर्षी चंदरअण्णा तावरे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, माळेगावचे माजी चेअरमन रंजन तावरे, माजी मार्केट कमिटी अध्यक्ष दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा दिग्विजय काकडे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा परिसरातील भाजपचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान व माजी संचालक,शेतकरी सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments