Purander । ज्युबिलंट प्रतिभा पुरस्कार २०२६ उपक्रमाचा निरा येथे शुभारंभ; २५ गुणवंत विद्यार्थ्यांना Lenovo टॅबलेटसह AI आधारित डिजिटल शिक्षणाची संधी


पुरंदर रिपोर्टर Live

निरा : प्रतिनिधी

            ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन आणि ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेड, निरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्युबिलंट प्रतिभा पुरस्कार २०२६’ या शिक्षणकेंद्रित उपक्रमाचा निरा येथे शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेतून २५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत, माध्यमिक विद्यालय खंडोबाचीवाडी-गडदरवाडी, श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल, गुळुंचे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरे खुर्द या चार शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला Lenovo टॅबलेट देण्यात आले असून, त्यामध्ये Mindspark हे AI आधारित Adaptive Learning Platform उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार वैयक्तिकृत शिक्षणाचा अनुभव मिळणार असून, ज्ञान, आकलन क्षमता आणि शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षे मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्यासाठी Pre-Assessment आणि Post-Assessment घेण्यात येणार असून, त्याद्वारे उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा परिणाम मोजला जाणार आहे.

कार्यक्रमास ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेड, निराचे Site Head डॉ. योगेश कोपारकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डिजिटल शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहन केले.

यावेळी EHS विभागाचे प्रमुख विनोद होंगेंकर तसेच Engineering विभागाचे प्रमुख विनोद घाटे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाच्या आयोजन व समन्वयाची जबाबदारी करण सावळकर, स्मिता काकडे, रेश्मा गायकवाड आणि मनोहर सूर्यवंशी यांनी पार पाडली. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या टीमच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

गुणवंत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची जोड देत त्यांच्या शैक्षणिक क्षमतेला योग्य दिशा देणारा ‘ज्युबिलंट प्रतिभा पुरस्कार २०२६’ हा उपक्रम भविष्यातील शैक्षणिक संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments