शिरूर : प्रतिनिधी
आज सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असताना लाखो रुपये किमतीचा सोन्याचा दागिना सापडल्यानंतर त्याचा मोह आवरणे अनेकांसाठी कठीण ठरू शकते. मात्र, शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील एका कष्टकरी दांपत्याने आपल्या कृतीतून “परिस्थिती गरीब असली तरी मन श्रीमंत असावे” याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
इनामगाव येथील वनिता आणि गोकुळ दळवी हे दांपत्य छोटासा लॉन्ड्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुंठाभरही शेती नाही, आर्थिक परिस्थिती बेताची; मात्र प्रामाणिकपणाची श्रीमंती मोठी आहे. इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या गठ्ठ्यात दळवी दांपत्याला तब्बल अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण आढळून आला.
या सोन्याची किंमत सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या किमतीचा दागिना हातात सापडल्यानंतरही दळवी दांपत्याच्या मनात लोभ निर्माण झाला नाही. “हे आपले नाही”, एवढाच विचार मनात ठेवून त्यांनी तातडीने संबंधितांना माहिती दिली आणि दागिन्याच्या मूळ मालकाचा शोध सुरू केला.
अखेर हा सोन्याचा गंठण सागर काळे यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर वनिता आणि गोकुळ दळवी यांनी कोणताही मोह न ठेवता सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे काळे यांच्या स्वाधीन केला.
हातात सोनं आलं, पण मनाचा तोल ढळला नाही; उलट त्यांच्या प्रामाणिकपणाने माणुसकीचं सोनं अधिक उजळून निघालं. दळवी दांपत्याच्या या कृतीचे इनामगावसह संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे. ग्रामस्थांनीही त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव करत सन्मान केला.
दरम्यान, शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनिषा कटके यांनी इनामगाव येथे प्रत्यक्ष भेट देत वनिता व गोकुळ दळवी दांपत्याचा सन्मान केला.


0 Comments