बारामती -प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सक्रिय झाला असून, पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या मुलाखती बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बारामती येथील हॉटेल कृष्णसागर, भिगवण रोड येथे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते युगेंद्रदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी करून सक्षम उमेदवारांची निवड, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी या मुलाखती महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राथमिक माहितीनुसार सुमारे १४० उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. शरद पवार गटाकडून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवारांनी निर्धारित वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments