बारामती । पणदरे येथे विवाहित महिलेचा निर्घृण खून; डोक्यात, चेहऱ्यावर वार करून टॉवेलने गळा आवळला ; परिसरात खळबळ.


पुरंदर रिपोर्टर Live. 

बारामती प्रतिनिधी. 

           बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात व चेहऱ्यावर धारदार अथवा अन्य हत्याराने मारहाण करून तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वैशाली यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्यापूर्वी पणदरे येथील राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत वैशाली पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून हल्ला केला. त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर कसल्यातरी हत्याराने मारहाण करण्यात आली. त्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून १३ सप्टेंबर रोजी पहाटे २.५० वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पाहणी केली.

अज्ञात आरोपीने घरात घुसून हा खून केला की अन्य कोणत्या कारणातून घटना घडली, याचा तपास पोलीस करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Post a Comment

0 Comments