जेजुरीजवळील पांडेश्वरमध्ये सर्पदंशाने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; परिसरात हळहळ
पांडेश्वर (ता. पुरंदर) :
जेजुरीजवळील पांडेश्वर येथे घराशेजारी खेळत असताना सर्पदंश झाल्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोही बाबूराव चव्हाण असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गुरुवारी (ता. २२ ऑक्टोबर) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे पांडेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोही घराजवळ खेळत होती. त्यावेळी तिला सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी उपचारांचे प्रयत्न करूनही आरोहीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची जेजुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

0 Comments