Baramati । बारामतीत डॉक्टराविरोधात विनयभंगाचा गुन्हा; महिला रुग्णाच्या तक्रारीने खळबळ.


पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती : प्रतिनिधी.  

         पोटदुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेने डॉक्टरांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी जवळ येत अयोग्य स्पर्श केल्याचा तसेच आपल्याला लज्जा वाटेल असे वर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीवरून बारामतीतील खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. राधेय खलाटे यांच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. सलाईन संपल्यानंतर डॉक्टरांनी तिला केबिनमध्ये बोलावले. त्यावेळी तिचा लहान मुलगाही सोबत होता. काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला पाठीच्या व्यायामाच्या हालचाली करण्यास सांगितले. यावेळी डॉक्टर वारंवार जवळ येत असल्याचे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.

आपल्यापासून अंतर ठेवण्यास सांगूनही डॉक्टर पुन्हा जवळ आल्याचा आरोप महिलेने केला आहे. हात मागे ताणण्याची हालचाल करत असताना डॉक्टरांनी कमरेला हात लावून छातीत धडधड होत आहे का, अशी विचारणा केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्याने पुढील व्यायाम करण्यास नकार देत औषधे देण्याची विनंती केली आणि त्यानंतर घरी परतल्याचे महिलेने सांगितले.

घरी आल्यानंतर या घटनेमुळे मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. दसऱ्याच्या दिवशी डॉक्टरांनी व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवल्यानंतर महिलेने त्यांना संदेश पाठवून संबंधित वर्तनाबाबत जाब विचारल्याचा दावा केला आहे. त्यावर डॉक्टरांनी माफी मागून पुन्हा असे होणार नाही, असा संदेश पाठवल्याचेही महिलेने म्हटले आहे.

नोकरीनिमित्त बाहेर असलेले पती बारामतीत परतल्यानंतर महिलेने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी तिने बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. राधेय खलाटे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसून, पोलिस तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Post a Comment

0 Comments