सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
सोमेश्वरनगरमध्ये नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांची फसवणूक; लोणंदमधील आरोपी वडगाव निंबाळकर पोलिसांच्या जाळ्यात!
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये नागरिकांची आर्थिक व्यवहारांसाठी गर्दी होत असताना, याच गर्दीचा फायदा घेत एका नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांनी सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून दिवाळी खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढले होते. बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती. त्यानंतर घरी जात असताना या व्यक्तीने काळ्या रंगाच्या मोपेडवरून येत त्यांना अडवले. तुमच्या खिशातील नोटा खराब असून त्या बदलून चांगल्या नोटा देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेत नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणाचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपास करून सरफराज मानू इराणी (वय ५०, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक केली आहे.
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सादिक इनामदार तपास करीत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, दीपक वारुळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, सणासुदीच्या काळात अनोळखी व्यक्तींकडून नोटा बदलून देणे किंवा इतर कोणत्याही बहाण्याने पैशांचे व्यवहार करण्यास सांगितल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांनी केले आहे.
पुरंदर रिपोर्टर Live | बारामती

0 Comments