बारामती | सामाजिक कार्याची दखल; मासाळवाडी चे सुपुत्र सुनील मासाळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड!



मोरगाव | प्रतिनिधी

           सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेच्या माध्यमातून समाजातील वंचित, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे मासाळवाडी गावचे सुपुत्र सुनील लक्ष्मण मासाळ यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मासाळवाडी गावासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुनील मासाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यात समन्वय साधत शासनाच्या योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. याशिवाय विविध शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि जनहिताची कामे यांच्या माध्यमातून त्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुनील मासाळ परिचित आहेत. त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची आणि जनसेवेतील योगदानाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर विशेष कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.

Post a Comment

0 Comments