इंदापूर । मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्यांवर भिगवण पोलिसांचा दणका! २२ वाहनचालकांवर कारवाई; ६० हजारांचा दंड वसूल.


पुरंदर रिपोर्टर  Live 

भिगवन  प्रवीण नरुटे.  

              मॉडिफाईड सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणे, फटाके फुटल्यासारखे आवाज करणे आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात भिगवण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ऑक्टोबर २०२६ या महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून पोलिसांनी ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकींच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून मोठ्या आवाजात फटाक्यांसारखे आवाज काढले जात असल्याने नागरिक आणि पादचारी त्रस्त झाले होते. या प्रकारांमुळे ध्वनी प्रदूषण वाढण्यासोबतच अपघातांचा धोकाही निर्माण होत होता. याची दखल घेत भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत बेकायदेशीररीत्या मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या २२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून संबंधित सायलेन्सर जप्त करण्यात आले आणि ते नष्ट करण्यात आले. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास करणे, विना नंबर प्लेट वाहने चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच शाळा आणि महाविद्यालयांसारख्या गर्दीच्या व शांतता क्षेत्रांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांनाही पोलिसांनी लक्ष्य केले. रस्ते अपघात रोखणे, नागरिकांची सुरक्षितता राखणे आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता.

दरम्यान, भिगवण पोलिसांनी सर्व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, नियमबाह्य सायलेन्सर बसवू नयेत आणि वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना सुरक्षिततेसाठी आवश्यक रिफ्लेक्टर लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा भिगवण पोलिसांनी दिला आहे.

भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक वारगड, शंकर भोसले, समीर झांबरे, रणजित मुळीक आणि महिला पोलीस अंमलदार भोंग यांनी ही कारवाई पार पाडली.

Post a Comment

0 Comments