सोलापूर प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत माढा तालुक्यातील तुळशी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, दुष्काळग्रस्त भागासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली.
काही दिवसांपूर्वी तुळशी गावातील ग्रामस्थांनी भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘तुळशी गाव विकणे आहे’ असे बॅनर लावले होते. या घटनेमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या गावाला आता शरद पवार यांनी भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शरद पवार यांनी १९७२ मधील दुष्काळाच्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळात सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना शक्य ती मदत केल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगतानाच, दुष्काळी परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी सूचना दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का आणि सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments