सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
पशुवैद्यकीय चिकित्सालय निबूत यांच्या वतीने जिल्हा परिषद सेसअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मका बियाण्याचे वाटप करण्यात आले. पशुपालकांना जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि चारा उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी चारा साक्षरता अभियानांतर्गत हिरवा चारा उत्पादन व त्याचे महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. रूपाली नामदेव जाधव यांनी उपस्थित शेतकरी व पशुपालकांना चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती बारामतीचे सदस्य दिग्विजय जगताप, निंबुत उपसरपंच अमर काकडे, गडदरवाडी माजी सरपंच शिवाजी गरदडे, ग्रा. प. सदस्य नंदकुमार काकडे, भाऊसो कोळेकर , प्रमोद बनसोडे, खंडोबाची वाडी, गडदरवाडी व निंबुत गावचे पशुपालक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाला पंचायत समिती बारामतीचे तालुका दुग्धविकास अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांचे मार्गदर्शन लाभले. शंभर टक्के अनुदानावर मका बियाणे उपलब्ध झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

0 Comments