सोमेश्वर नगर । भाऊबीजेची अनोखी भेट! ऊसतोड मजूर महिलांना रोटरी क्लबकडून २ हजार साड्यां चे वाटप;‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमातून सोमेश्वर कारखान्यावर महिलांची दिवाळी गोड


पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

    ऊसतोड मजूर महिलांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी रोटरी क्लबच्या विविध शाखांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एक साडी तिच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आलेल्या महिलांना भाऊबीजेनिमित्त तब्बल दोन हजार साड्यांचे दिवाळी भेट म्हणून वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘कोपीवरची शाळा’ या टीमने कार्यक्रमाचे संयोजन केले.

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते साडीवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल नितीन ढमाले होते. यावेळी इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंटचे संचालक वसंतराव मालुंजकर, प्रकल्प संचालक प्रतिभा जगदाळे, सहसंचालक पार्श्वेंद्र फरसोले यांच्यासह विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजवर्धन शिंदे म्हणाले की, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी स्वतःहून शाळा चालविणारा आणि महिला मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणारा सोमेश्वर हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. तर नितीन ढमाले यांनी ऊसतोड मजूर महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमास अतुल गांधी (रोटरी क्लब बारामती), अशोक बसाळे (रोटरी क्लब ऑफ सुपा परगणा), मंदाकिनी डोंबाळे (रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल), संदीप टिळेकर (रोटरी क्लब ऑफ पुरंदर), विनोद अग्रवाल (रोटरी क्लब पुणे साउथ), आझाद पटेल व भीमाशंकर जाधव (रोटरी क्लब ऑफ इंदापूर) उपस्थित होते.

‘कोपीवरची शाळा’ प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक वसंतराव मालुंजकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी केले, तर प्रतिभा जगदाळे यांनी आभार मानले.

चौकट : बारामती रोटरी क्लबचे योगदान.  

या उपक्रमासाठी तळेगाव, दक्षिण पुणे, पुणे विद्यापीठ, वेस्टएन्ड, सहवास, गोरेगाव, महाड, डेक्कन जिमखाना, दौंड, इंदापूर, पनवेल, पुणे कॅम्प, रॉयल, शिवनेरी, सुपा, फिनिक्स, भोसरी, औंध, फार ईस्ट, ईस्ट, मगरपट्टा, चाकण, प्राइड, युवा, एनआयबीएम, पुणे एअरपोर्ट, विमाननगर आदी रोटरी क्लबने योगदान दिले.

Post a Comment

0 Comments