पुरंदर । रसिकांसाठी पर्वणी! पिंपरे खुर्द येथे १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान जागृती व्याख्यानमाला; दहाव्या वर्षात पदार्पण; व्याख्यान, नाटकांची मेजवानी अन् किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.


पुरंदर रिपोर्टर Live 

नीरा प्रतिनिधी.  

          सुरज सामाजिक संस्था व समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांच्या वतीने पिंपरे खुर्द येथे दि. १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान जागृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदा दहावे वर्ष असून पुरंदर तालुक्यातील रसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुकन्या गुरव गुंफणार आहेत. यावेळी 'यात्रा' हे एकपात्री नाटक सादर होणार असून त्याचे लेखन व दिग्दर्शन मुक्ताधाम यांचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे असणार आहेत.

दुसरे पुष्प दि. १५ नोव्हेंबर रोजी रामदास माने गुंफणार असून 'असा घडतो उद्योजक' हा व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्षस्थानी WOM ग्रुप, पुणे चे मानव संसाधन व प्रशासन विभागाचे जनरल मॅनेजर शिवाजी चौंडकर असणार आहेत.

तिसरे व अंतिम पुष्प दि. १६ नोव्हेंबर रोजी 'कडेलोट' या एकपात्री नाटकाने गुंफले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कल्पेश समेळ यांनी केले आहे. यावेळी दैनिक सकाळचे पत्रकार संतोष शेंडकर अध्यक्षस्थानी असणार आहेत.

या कार्यक्रमाला जुबिलियंट भारतीय फाउंडेशन, नीरा-निंबूत व समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच आचार्य ग्रुप ऑफ कंपनी, शिर्डी केमिकल प्रा. लि., नवी मुंबईचे सीनियर मॅनेजर लक्ष्मण थोपटे, अद्वैत एंटरप्राइजेस, पुणेचे बबन थोपटे आणि थोपटे कन्स्ट्रक्शन, पिंपरे खुर्दचे उद्योजक राहुल थोपटे यांचे सौजन्य लाभले आहे. साऊंड सिस्टिमचे सौजन्य राजेंद्र मंडप डेकोरेटर्स यांचे आहे.

यावेळी किल्ले स्पर्धा २०२६ मधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचा पुरंदर तालुक्यातील नागरिक व रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments