पुणे प्रतिनिधी
स्वतःच्या दिवाळीचा आनंद बाजूला ठेवून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा अनोखा उपक्रम आधार सोशल ट्रस्टच्या वतीने यंदाही राबविण्यात आला. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील भारत-चीन सीमेवरील अत्यंत महत्त्वाच्या बुमला पास (Bum La Pass) येथील इंडियन आर्मी बेस कॅम्पमध्ये जाऊन ट्रस्टच्या सदस्यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांसाठी तब्बल ३ हजार किलो दिवाळी फराळ नेण्यात आला.
आधार सोशल ट्रस्टने गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेली जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची अखंड परंपरा यंदाही कायम राखली. महाराष्ट्रातील माता-भगिनींनी प्रेमाने तयार केलेला दिवाळी फराळ तसेच विद्यार्थ्यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेश जवानांपर्यंत पोहोचविण्यात आले. हजारो किलोमीटरचा प्रवास, प्रतिकूल हवामान आणि दुर्गम पर्वतीय भागातील आव्हानांवर मात करत ट्रस्टच्या सदस्यांनी सीमेवर पोहोचून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तीन हजार किलो फराळाच्या माध्यमातून केवळ मिठाईच नव्हे, तर महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद आणि देशाच्या रक्षणकर्त्यांविषयीची आत्मीयता जवानांपर्यंत पोहोचविण्यात आली. सीमेवर कर्तव्य बजावताना सण-उत्सवांपासून दूर राहणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठीही अविस्मरणीय ठरला.
आधार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अकरा वर्षांपासून हा प्रेरणादायी उपक्रम सातत्याने सुरू आहे. यामध्ये संदीप काकडे, उद्योजक बुवासाहेब हुंबरे, दत्तराजे देसाई सरकार यांच्यासह १०० हून अधिक सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
स्वतःच्या सणाचा आनंद बाजूला ठेवून देशाच्या रक्षणकर्त्यांसोबत दिवाळी साजरी करणाऱ्या आधार सोशल ट्रस्टच्या या उपक्रमातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले. जवानांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

0 Comments