Baramati | बारामती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार अत्याधुनिक तपासणी यंत्रे; ZP सदस्य करण खलाटे यांच्या पाठपुराव्याला यश!

 


बारामती | प्रतिनिधी

बारामती | प्रतिनिधी

                ग्रामीण भागातील नागरिकांना रक्त तपासणीसह विविध प्रयोगशाळा चाचण्यांसाठी बाहेरील खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागू नये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने बारामती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक तपासणी यंत्रे उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १३० तपासणी यंत्रांचे पुणे जिल्हा परिषदेत वितरण करण्यात आले असून, यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेला मोठे तांत्रिक बळ मिळणार आहे. ही माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा जनआरोग्य समितीचे अध्यक्ष करण खलाटे यांनी दिली.

होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनआरोग्य समितीच्या बैठकीत आधुनिक रक्त तपासणी यंत्रांची आवश्यकता आणि ग्रामीण रुग्णांना स्थानिक पातळीवरच तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मांडण्यात आली होती. या बैठकीस जनआरोग्य समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, आशाताई वायाळ, जितेंद्र पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आणि डॉ. राजगे उपस्थित होते.

          या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनआरोग्य समितीचे अध्यक्ष करण खलाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधत आधुनिक तपासणी यंत्रांसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीची दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्ह्यासाठी १३० तपासणी यंत्रे उपलब्ध करून दिली.

                   

             पुणे जिल्हा परिषदेत झालेल्या या यंत्रसामग्री वितरणप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, सभागृह नेते श्रीमंत ढोले आणि जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे उपस्थित होते.

काय आहेत या अत्याधुनिक यंत्रांची वैशिष्ट्ये?

या यंत्रसामग्रीमध्ये प्रामुख्याने बायोकेमिस्ट्री ॲनालायझर आणि थ्री-पार्ट हेमॅटोलॉजी ॲनालायझर या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या यंत्रांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच रक्त तपासणीसह विविध प्रयोगशाळा चाचण्या करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होईल. तसेच वेळेत तपासणी, अचूक निदान आणि पुढील उपचार प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.

होळ येथील जनआरोग्य समितीच्या बैठकीत मांडलेल्या स्थानिक आरोग्यविषयक मागणीचा विस्तार संपूर्ण पुणे जिल्ह्यापर्यंत झाला आहे. करण खलाटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बारामती तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.


Post a Comment

0 Comments