बारामती | प्रतिनिधी
निरावागज गावात आणि परिसरात फोफावलेल्या अवैध दारू विक्री आणि मटका व्यवसायासारख्या असामाजिक व बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ व कठोर कायदेशीर बडगा उचलावा, या मागणीसाठी बारामती-पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच माळेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संपकाळ साहेब यांची सदिच्छा भेट घेत एक अत्यंत महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले.
गावात सर्रास सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे निरावागज गावातील शांतता धोक्यात आली असून, तरुण पिढी या वाईट व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे. या गंभीर समस्येमुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निष्पाप नागरिक, महिला आणि शाळकरी मुले-मुली यांना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच निरावागजच्या युवा पिढीचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित राहावे, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कारवाई करावी, अशी आक्रमक व हक्काची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
अवैध धंद्यांना थारा नाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता हेच आमचे ध्येय!" या ठाम भूमिकेसह परिसरातील नागरिकांनी आणि युवकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर या अवैध धंद्यांवर पूर्णपणे आळा घालण्यात आला नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.
यावेळी गावातील प्रमुख नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाकडून यावर नेमकी काय कठोर कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

0 Comments