बारामती | सामाजिक कार्याला मिळाली शासन मान्यता; मुरूमच्या सचिन जगताप यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

 


पुरंदर रिपोर्टर Live 
   
सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

       महाराष्ट्र शासनाच्या वतीने बारामती तालुक्यात नुकत्याच ४१ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरूम गावचे रहिवासी तथा बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन अशोक जगताप यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मुरूम वानेवाडी सह सोमेश्वर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सचिन जगताप हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सामाजिक व जनसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. महिलांसाठी विविध उपक्रम, बचत गटांची स्थापना, महिलांसाठी 'होम मिनिस्टर' कार्यक्रम तसेच अल्पदरात देवदर्शनाचे आयोजन असे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

याशिवाय, दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अल्पोपाहार वाटप, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत मिळवून देणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, घरकुल व शौचालय यांसारख्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सोमेश्वर पंचक्रोशीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्यातील सक्रियता आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला संपर्क यामुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या सामाजिक व जनसेवेतील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर विशेष कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सचिन जगताप यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments