पुरंदर रिपोर्टर Live | पुणे प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी एका महिला आरोपीने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाने प्रसंगावधान राखत वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास चिखली-नेवाळेवस्ती येथील ऐश्वर्यम कोर्टयार्ड इमारतीजवळ हा प्रकार घडला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी विजय सातपुते (वय २६, रा. चिखली) यांना गाठले. यावेळी महिला आरोपीने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय यांनी वेळीच वार चुकवल्याने त्यांचा जीव वाचला.
या प्रकरणी विजय सातपुते यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह विशाल डाबेराव (वय २३), साहिल अतुल महिंद्र (वय १८) आणि मोहित या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

0 Comments