पुरंदर | नाझरे कप
शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण, तिघे जखमी!
पुरंदर तालुक्यातील नाझरे कप येथे शेतात खोदलेला खड्डा बुजविण्यावरून दोन कुटुंबांत वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेसह दोघा भावांना काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजश्री संजीव रांधवण आणि प्रकाश संजीव रांधवण यांच्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत नामदेव रांधवण यांच्या नाझरे कप येथील शेतात मोठा खड्डा खोदण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी गणपत रांधवण हे आपल्या भावांसह कुटुंबीयांना घेऊन शेतात गेले. खड्ड्याबाबत विचारणा केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. संबंधित जमीन खरेदी केलेली असून न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने असल्याचे सांगत एका बाजूने जेसीबीच्या साह्याने खड्डा बुजविण्यास सुरुवात केली.
यावेळी शिवीगाळ आणि दमदाटी झाल्याने पोलिसांना ११२ क्रमांकावर संपर्क करण्यात आला. पोलीस घटनास्थळी येऊन गेल्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी निर्मला संपत रांधवण यांना केस धरून खाली पाडत काठीने खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच गणपत रांधवण आणि संपत रांधवण यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेत जखमी झालेल्यांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गणपत रांधवण यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

0 Comments