पुरंदर रिपोर्टर Live
निरा— विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथील ग्रामीण भागात शिक्षणाची कास धरून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. निरा येथे रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी अधिकृत पत्राद्वारे रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीत निरा व परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लांब अंतर प्रवास करून सोमेश्वर, माळेगाव,बारामती, पुणे किंवा इतर शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये जावे लागते. हे शिक्षण केवळ वेळखाऊ नसून, आर्थिकदृष्ट्या कष्टदायक देखील ठरते. यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या अवस्थेत पोहोचतात. विशेषतः मुलींना सुरक्षिततेच्या कारणामुळे शहरांमध्ये जाण्यास मर्यादा येतात.
ही परिस्थिती लक्षात घेऊन खा.सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांना पाठवलेल्या पत्रामध्ये निरा येथे लवकरात लवकर वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांना व पालकांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, ही काळाची गरज आहे.”
जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण यांनी निरे मध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू करावे हा प्रस्ताव खा. सुप्रिया सुळेंच्या कडे देऊन वरिष्ठ विद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती.
रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक नामांकित व गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था असून ग्रामीण भागात शिक्षण पोहचवण्यासाठी तिचा मोठा वाटा आहे. अशा संस्थेचे महाविद्यालय निरा येथे सुरू झाल्यास, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा वाढतील, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
या प्रस्तावाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि निरा परिसरातील विद्यार्थ्यांना घराजवळ उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments