धक्कादायक! थार गाडीसाठी पैशांचा तगादा - उच्चशिक्षित विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न!सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल…


पुरंदर रिपोर्टर Live 

लोणी काळभोर: प्रतिनिधी 

                वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात तापलेले वातावरण निवळायच्या आतच लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ थार गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा, त्यासोबत शारीरिक आणि मानसिक छळ याला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.


ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली असून, 28 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली. पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेली नावे:

•पती सौरभ सुनिल सातव (वय 29)

•सासू सविता सुनिल सातव

•सासरे सुनिल शिवाजी सातव (सर्व रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे)

•नणंद साक्षी प्रतिक बोराटे (रा. मोशी)

•पतीची मैत्रिण अपूर्वा रमेश कड

•पतीची मावशी विद्या भुमकर

•पतीचे काका अतिष भुमकर

                  पीडिता ही पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत कार्यरत असून तिचा पाच महिन्यांपूर्वी सौरभ सातव यांच्याशी विवाह झाला. काही दिवसांतच पती सौरभकडून तिला मानसिक त्रास सुरू झाला. सासरकडील मंडळीही सौरभची बाजू घेऊन पीडितेवर दबाव टाकू लागली.


यातच तिच्या संस्थेकडून पगार थांबल्याने घरात वाद वाढले. आरोपींनी थार गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव आणला. सौरभ सातव हा पीडितेला मारहाण व शिवीगाळ करत होता. याशिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. परिणामी तिचे आईवडील तिला माहेरी घेऊन आले.

      28 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास, पीडित विवाहितेने माहेरीच राहत्या घरी दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. साडेतीनच्या सुमारास घरच्यांनी तिला गंभीर अवस्थेत आढळून आल्यावर तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.

सदर प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात IPC कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३५१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे पुढील तपास करत आहेत.


१४ पानांची सुसाईड नोट…

आत्महत्येच्या प्रयत्नाआधी पीडित विवाहितेने १४ पानी सुसाईड नोट लिहिली असून, यात पती आणि सासरकडील मंडळींच्या त्रासाचे गंभीर आरोप आहेत. तिचे स्त्रीधन काढून घेणे, पैशासाठी मारहाण, शिवीगाळ, आणि पतीचे मैत्रिणीसोबत विवाहबाह्य संबंध यांचा सविस्तर उल्लेख आहे. पोलिसांसाठी ही सुसाईड नोट एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments