निरा-मोरगाव रोडवरील खड्डे जीवघेणे; वाहनचालक त्रस्त, ग्रामस्थांची डागडुजीची मागणी.

पुरंदर रिपोर्टर.   

प्रतिनिधी | विजय लकडे. 


निरा-मोरगाव मार्गावरील खड्डे सध्या वाहनचालकांसाठी मोठे संकट ठरत असून, विशेषतः दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेल्या या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.


निरा पासून पुढे साधारणतः १० किलोमीटरपर्यंत या मार्गावर मोठ्या खड्ड्यांची मालिका पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन गंभीर जखमी झाले आहेत. हे खड्डे इतके खोल आहेत की, वाहनांचा तोल जातो आणि चालक थेट जमिनीवर आपटतो.


या मार्गावरून मोरगावकडे जाणाऱ्या भक्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. शिर्डी, शनिशिंगणापूर आणि अष्टविनायक यात्रेतील मोरगाव हे पहिले स्थान असल्याने येथे वर्षभर भाविकांची ये-जा सुरू असते. याशिवाय अनेक औद्योगिक मालवाहतूकही या मार्गावरून होते. त्यामुळे २४ तास या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते.


विशेषतः निरा येथून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दगडे वस्ती, निरा डावा कालवा पूल ते गुळूंचे रोड या परिसरात खड्ड्यांची संख्या अधिक असून ते अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. विशेषता दगडे वस्ती येथील रोडवरील खड्डे जास्त प्रमाणात धोकादायक आहेत याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत गटाराचे सांडपाणी देखील रोड वरती येत असल्यामुळे वाहन चालकांना येथील खड्डे दिसून येत नाहीत यामुळे या ठिकाणी  अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाली आहेत. पावसाळा अजून सुरू झालेला नसताना या खड्ड्यांनी मार्गाची अवस्था बिकट केली आहे.


ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, डागडुजी करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशाराही दिला आहे.

Post a Comment

0 Comments