पुरंदर रिपोर्टर Live....
दौंड : प्रतिनिधि
दौंडच्या केडगाव जवळच असलेल्या मोरे वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास सुमारास ५ ते ६ जण असलेल्या दरोडेखोरांच्या टोळक्याने एका ६० वर्षीय शेतकऱ्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरून डोक्यात कोयत्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोपट मोरे (वय ६० वर्ष) रा.मोरेवस्ती असे गंभीर जखमी झालेल्या शेतकाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (२४ मे) रोजी घडली. मारहानीनंतर चोरट्यांनी २ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोरेवस्ती येथील शेतकरी पोपट मोरे (वय ६० वर्ष) हे या चोरट्यांच्या हल्लात गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच याच परिसरातील अशोक देशमुख यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घर फोडून २ तोळे सोने चोरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शेतकरी पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरासमोर झोपले होते. तेंव्हा अचानक आलेल्या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तसेच पोपट मोरे यांचा भाऊ बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला धारदार चाकू लावुन धमकावले. बाळासाहेब मोरे यांनी आरडाओरडा करताच अंधाराचा फायदा घेत चोरटे घटनास्थळावून पसार झाले.
दरम्यान, या घटनेतील जखमी शेतकरी पोपट मोरे यांच्यावर केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी शेतकरी याची रुग्णालयात तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास केला जात असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी म्हटले आहे.
0 Comments