दौंडमध्ये २४ तासांत तिघांचा मृत्यू : रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, दोन आकस्मिक मृत्यूंची नोंद.




पुरंदर रिपोर्टर लाईव्ह

दौंड | प्रतिनिधी


दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील २४ तासांत तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून, यामध्ये एका युवकाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दोन जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने दोन्ही प्रकरणांची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पहिली घटना पाटील हॉस्पिटल (दौंड) येथे घडली. अभिषेक गोविंद पहाडे (वय २४, रा. निमगाव खेलु, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या तरुणाने हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील खाजगी रूममध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. डॉक्टर पाटील यांनी याबाबत अभिषेकच्या भावाला माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने अभिषेकला खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर नंबर ७०/२०२५ नोंदवण्यात आला आहे.


दुसऱ्या घटनेत, खोदवाडी (ता. दौंड) येथील गट नंबर २३९ मधील शेतातील विहिरीत ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाने पांढऱ्या रंगाचा लाईनिंग शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. त्याचे केस लालसर रंगाचे होते. पोलीस पाटील भारत महादू जोरवर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असून, या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.


तिसऱ्या घटनेत, दौंड शहरातील शिवाजी चौक येथील अहिर गुरुजी भवन परिसरात, ताराबाई विश्वचंद्र अहिर (वय ७५) या महिला वैष्णवी फ्लॉवर मार्ट या दुकानात बसलेल्या असताना त्यांच्या राहत्या घराची भिंत अचानक पत्र्याच्या शेडवर कोसळली. त्यांच्या भाच्याने – मंगलकुमार अहिर – यांनी तातडीने त्यांना आनंद हॉस्पिटल येथे नेले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्र. ६८/२०२५ म्हणून करण्यात आली आहे.


दौंड पोलीस ठाण्यांचे अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. मृत्यूच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Post a Comment

0 Comments