पुरंदर रिपोर्टर Live
इंदापूर : प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील सोरटी गावात ( २४ में ) शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. सुधीर राऊसाहेब महाडिक (वय ४९) हे त्यांच्या मित्राची परवानाधारक बंदूक हाताळत असताना अचानक गोळी सुटली आणि त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोळी लागल्यानंतर त्यांना तात्काळ अकलूज येथील इनामदार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधर्शन राठोड यांनी रुग्णालयाला भेट देऊन सुधीर महाडिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा ग्रामीण पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणी माहिती देताना एसपी संदीपसिंह गिल म्हणाले, “सुधीर महाडिक हे त्यांच्या मित्राची बंदूक हाताळत असताना ती चुकून सुटली व त्यांना गोळी लागली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, योग्य ती कारवाई केली जाईल.”
0 Comments