पुरंदर रिपोर्टर –
विजय लकडे,
खंडोबाची वाडी येथील हर हर महादेव कावड मंडळ यांनी महिलांसाठी एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेत, दोन दिवसीय अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन केले. महिलांसाठी खास राबवलेल्या या यात्रेमुळे अध्यात्मिक समाधानासोबत सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण मंडळाने उभे केले आहे.
दिनांक १७ मे रोजी पहाटे पाच वाजता खंडोबाची वाडी येथून या यात्रेला शुभारंभ झाला. सर्वप्रथम मोरगाव येथील अष्टविनायकांपैकी पहिल्या गणरायाचे दर्शन घेऊन पुढील दोन दिवसांत उर्वरित अष्टविनायकांचे दर्शन महिलांना घडवण्यात आले. या यात्रेत खंडोबाची वाडी व आजूबाजूच्या परिसरातील एकूण ४१ महिलांनी सहभाग घेतला.
या यात्रेतील प्रत्येक व्यवस्थेची जबाबदारी हर हर महादेव कावड मंडळाने पार पाडली. प्रवास, चहा-नाश्ता, भोजन, निवास अशा सर्व सुविधा पूर्णपणे मोफत पुरवण्यात आल्या. महिलांना कुठलाही खर्च न करता भक्तीचा, आनंदाचा आणि एकात्मतेचा अनुभव घेता आला.
या उपक्रमामागे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, उपाध्यक्ष मच्छिंद्र लकडे, तसेच बाबूलाल लकडे, शिवाजी गुळदगड, सुनील मदने, बापू धायगुडे आणि मंडळाचे इतर कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे खंडोबाची वाडी व परिसरातील महिलांना प्रथमच अष्टविनायक दर्शनाचा योग लाभला.
या संपूर्ण यात्रेदरम्यान महिलांनी “गणपती बाप्पा मोरया!” चा जयघोष करत वातावरण भक्तिमय केले. त्यांनी हर हर महादेव कावड मंडळाचे मनापासून आभार मानले व या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
महिलांच्या सक्षमीकरणाचा संगम घडवणारा हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल!
0 Comments