शिरूर (पुणे) –
महिलांवरील अत्याचार आणि छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना शिरूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाबुराव नगर येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात मानसिक व शारीरिक छळ, हुंड्यासाठी त्रास व मारहाणीच्या आरोपाखाली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी अनिल सुरेश सालके (पती), शैलाबाई सुरेश सालके (सासू), सुरेश दगडू सालके (सासरे), रेश्मा गणेश सालके (जाऊ) आणि गणेश सुरेश सालके (दिर) – सर्व रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर – यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला मोहिनी उर्फ रेश्मा अनिल सालके (वय 34, रा. बाबुराव नगर, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीला तिच्याशी चांगले वागणूक दिली गेली. मात्र काही काळानंतर माहेरून पैसे आणण्याचा तगादा, शिवीगाळ, दमदाटी, उपाशी ठेवणे, आणि मारहाण अशा प्रकारातून तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ केला गेला.
तसेच पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नात दिलेले 11 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले गेले आणि तिच्या वडिलांकडून सासरच्या मंडळींनी दोन लाख रुपये घेतले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहेत.
0 Comments