पुरंदर रिपोर्टर Live
आषाढी वारी निमित्त राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदाही वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षेसाठी समूह विमा योजना राबवण्यात येणार आहे. तसेच वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा, वॉटरप्रूफ तंबू, मुबलक पाणी व वीज पुरवठा आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या वारकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुठेही रस्ते खराब झाले असतील तर मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. वारी मार्गावर सुसज्ज रुग्णवाहिका, पालखीतळावर वॉटरप्रूफ तंबू, तसेच वीज आणि पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
यावर्षीही दरवर्षीप्रमाणे वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. तसेच वारी दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत करण्यात येणार आहे.
वारी काळात भोजन व्यवस्था, प्रथा आणि पूजा वेळेत पार पडण्यासाठी सर्वतोपरी सुविधा पुरवण्यात येणार असून, शासन व प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी आणि वारी निर्विघ्न पार पडावी यासाठी शासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments