पहिल्याच पावसात शेतकऱ्याचं स्वप्न उध्वस्त : पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली ,पत्रे उडाले ,१८,००० कोंबड्यांचा मृत्यु.



                       पुरंदर रिपोर्टर लाईव्ह

दौंड | प्रतिनिधी

                                         राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान पुण्यातील दौंड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हातवळण गावात एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तब्बल 18,000 कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


शुभम गोगावले या शेतकऱ्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय असून, त्यांनी केवळ वर्षभरापूर्वी कर्ज घेऊन पोल्ट्री शेड उभारली होती. या शेडमध्ये सुमारे 22 ते 23 हजार कोंबड्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि वादळामुळे शेडवरील पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामुळे फार्ममधील हजारो पक्षांचा मृत्यू झाला.


गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 9 ते 10 हजार मृत पक्षी बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृत पक्षांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेल्या कोंबड्यांची संख्या 18,000 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


या घटनेत शुभम गोगावले यांचे जवळपास 80 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता ते सरकारकडून मदतीची मागणी करत आहेत.


राज्यातल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर शेती आणि व्यवसायांचं नुकसान झाल्याचं चित्र समोर येत आहे. दौंडसारख्या ग्रामीण भागात अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जीवन अधिक अडचणीत सापडत आहे. सरकारने तात्काळ पंचनामा करून योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.


Post a Comment

0 Comments