बारामती : प्रतिनिधी
सोशल मीडियावर गावठी बनावटीचे पिस्तूल हातात घेऊन आक्षेपार्ह मजकूरासह पोस्ट करणाऱ्या नेहल उर्फ रावण विजय दामोदर (वय 25, रा. वडके नगर, आमराई, बारामती) या तरुणाला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या ‘शक्ती अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या ‘शक्ती नजर’ योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोस्ट करणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवले जात आहे. या प्रकरणात नेहल दामोदर याने गावठी बनावटीचे पिस्तूल हातात घेऊन आक्षेपार्ह मजकूरासह पोस्ट केली होती.
ही कारवाई बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, राहुल भंडारे, पोलीस अंमलदार सागर जमदार, अमीर शेख, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, अक्षय सिताप, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते यांनी केली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ‘शक्ती अभियान’ हे सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी ‘पंचतंत्र अभियान’ राबवण्यात येत असून, त्यानुसार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर गोपनीयरित्या तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर ‘शक्ती नजर’ यामार्फत प्रशिक्षित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
या कारवाईमुळे सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोस्ट करणाऱ्यांना धडा मिळाला असून, पोलिसांच्या ‘शक्ती नजर’ मोहिमेची प्रभावीता अधोरेखित झाली आहे.
0 Comments