पुरंदर रिपोर्टर Live
पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पीडित वैष्णवीच्या चारित्र्यावर सार्वजनिकरित्या शंका घेणाऱ्या आरोपींच्या वकील विपूल दुशिंग यांच्याविरोधात आता राज्य महिला आयोगाने कारवाईची भूमिका घेतली आहे. आयोगाने बार कौन्सिलला पत्र पाठवून वकील दुशिंग यांच्या वर्तनाविषयी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
महिला आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, विपूल दुशिंग यांचे वर्तन हे ‘ॲडव्होकेट्स अॅक्ट 1961’ मधील तरतुदींना अपमानित करणारे आहे. त्यामुळे अशा अधिवक्त्यांविरोधात गंभीरपणे विचार केला जावा आणि भविष्यातील प्रकरणांसाठी स्पष्ट मार्गदर्शक नियमावली आखावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे ही तरुणी सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे मृत्युमुखी पडल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, आरोपींच्या वतीने माध्यमांमध्ये वैष्णवीच्या चारित्र्याविषयी विपूल दुशिंग यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
चारित्र्यहननामुळे मानसिक त्रास
या वक्तव्यामुळे पीडितेची प्रतिमा मलीन होत आहे आणि त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मानसिक व भावनिक त्रास सहन करावा लागत आहे, असे आयोगाने नमूद केले आहे. समाजाने अशा वेळी पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवली पाहिजे, असा संदेशही आयोगाच्या पत्रात देण्यात आला आहे.
माध्यमांतील गैरवर्तन निंदनीय
पत्रात पुढे म्हटले आहे की, न्यायप्रक्रिया सुरू असताना पीडितेच्या चारित्र्यावर माध्यमांद्वारे केले जाणारे टीकेचे वृत्तांकन हे पूर्णतः अयोग्य व मनोबल खच्ची करणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वर्तनाविरोधात योग्य ती शिस्तभंगाची कारवाई व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगाने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली आहे.
0 Comments