पुरंदर रिपोर्टर Live
दौंड (प्रतिनिधी) –
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना सोमवारी (३० जून) पहाटे घडली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शनासाठी सोलापूरच्या दिशेने निघालेलं एक कुटुंब थांबलेल्या चहाच्या टपरीवर दोन अज्ञात तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. यानंतर या तरुणांनी कुटुंबातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने खासगी वाहनाने निघालेलं कुटुंब स्वामी चिंचोली गावाजवळ पहाटे चार च्या सुमारास चहासाठी थांबले. त्याच वेळी दोन युवक दुचाकीवरून आले आणि त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत कुटुंबातील व्यक्तींना धमकावलं. गळ्याला कोयता लावून सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिथून काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी पाहणी करून पुढील तपासासाठी विशेष पथक तैनात केलं आहे. सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात सघन तपास सुरू केला आहे.
दौंड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
0 Comments